Sunday, July 26, 2009

पिती अंधारात सारे

पिती अंधारात सारे
झाले मोकळे हो ग्लास
नाकानाकातून वाहे
एक उग्र असा वास ॥धृ॥


बार जागे झाले सारे
बारबाला जाग्या झाल्या
सारे जमता हो एकत्र
बाटल्याही समोर आल्या
सारे रोजचे तरीही
नवा सुवास सुवास ॥१॥


दारु पिऊन नवेल्या
झाल्या बेवड्यांच्या जाती
बारमधेच साऱ्यांच्या
सरु लागल्या हो राती
क्षणापूर्वीचे पालटे
जग भकास भकास ॥२॥

जुना सकाळचा प्रकाश
झाला संध्येचा काळोख
दारुड्यांचा दारुड्यांना
दारुनेच अभिषेक
एक अनोखे हे मद्य
आले ग्लासात ग्लासात ॥३॥

क्षणोक्षणी चुका घडतात,

क्षणोक्षणी चुका घडतात,
आणि श्रेय हरवून बसतात.
आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला
फार काही शिकवत असतात.
कणभर चुकीलाही
आभाळाएवढी सजा असते,
चुक आणि शिक्षा यांची कधी
ताळेबंदी मांडायची नसते
एक कृती, एक शब्द
एकच निमिष हुकतं-हुकतं
उभ्या जन्माच्या चुकामुकीला
तेवढं एक निमित्त पुरतं
अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी
आपण मात्र शिकत असतो
पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी!

दिसलीस तू, फुलले ऋतू

दिसलीस तू, फुलले ऋतू
उजळीत आशा, हसलीस तू

उरले न आसू, विरल्या व्यथाही
सुख होऊनिया, आलीस तू

जाळीत होते, मज चांदणे ते
ते अमॄताचे, केलेस तू

मौनातुनी ये, गाणे दिवाणे
त्याचा अनामी, स्वरभास तू

जन्मात लाभे, क्षण एकदा हा
ते भाग्य माझे, झालीस तू

गीत - सुधीर मोघे
संगीत - राम फाटक
गायक - सुधीर फडके
राग - तिलककामोद, देस

Saturday, July 25, 2009

चिऊताई दार उघड !

दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !

दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील ?

वारा आत यायलाच हवा!
मोकळा श्वास घ्यायलाच हवा !

दार उघड,
दार उघड,
चिऊताई चिऊताई, दार उघड !

फुलं जशी असतात,
तसे काटेही असतात.
सरळ मार्ग असतो,
तसे फाटेही असतात !

गाणा-या मैना असतात.
पांढरे शुभ्र बगळे असतात.
कधी कधी कर्कश्य काळे
कावळेच फ़क्त सगळे असतात .

कावळ्याचे डावपेच पक्के असतील.
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील .

तरीसुद्धा या जगात वावरावंच लागतं.
आपलं मन आपल्यालाच सावरावं लागतं .

दार उघड
दार उघड चिऊताई,
चिऊताई दार उघड !

सगळंच कसं होणार
आपल्या मनासारखं?
आपलं सुद्धा आपल्याला
होत असतं परकं !

मोर धुंद नाचतो म्हणून
आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून
आपण का खिन्न व्हायचं ?

तुलना करित बसायचं नसतं गं
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं !

प्रत्येकाच्या आत
फुलणारं फूल असतं.
प्रत्येकाच्या आत
खेळणारं मूल असतं !

फुलणा-या फुलासाठी,
खेळणा-या मुलासाठी ,

दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !

निराशेच्या पोकळीमध्ये
काहीसुद्धा घडत नाही.
आपलं दार बंद म्हणून
कुणाचंच अडत नाही !

आपणच आपला मग
द्वेष करू लागतो
आपल्याच अंधाराने
आपलं मन भरू लागतो

पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं.
तुला शोधित फुलपाखरु नाचत आलं .

चिऊताई चिऊताई
तुला काहीच कळलं नाही .

तुझं दार बंद होतं.
डोळे असून अंध होतं .

बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल ?

दार उघड
दार उघड चिऊताई
चिऊताई दार उघड !

------------------------------------------
भाषेच्या च-हाटाला कधीही अंत नसतो !
सारखी बडबड करणारा चुकूनही संत नसतो !

- Mangesh Padgaonkar

Monday, July 13, 2009

मन वढाय वढाय

मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वाऱ्यानं चालल्या
पान्यावरल्यारे लाटा

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
आरे, इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर!

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात

मन चप्पय चप्पय
त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर

मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं?
आभायात बी मायेना

देवा, कसं देलं मन
आसं नही दुनियात!
आसा कसा रे तू योगी
काय तुझी करामत!

देवा, आसं कसं मन?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले
असं सपनं पडलं!

वार्‍याने हलते रान

वार्‍याने हलते रान, तुझे सुनसान हृदय गहिवरले
गाईचे डोळे करुण उभे की, सांज निळाईतले

डोळयात शीण, हातात वीण, देहात फुलांच्या वेगी
अंधार चुकावा म्हणून, निघे बैरागी

वाळूत पाय, सजतेस काय, लाटांध समुद्रकाठी
चरणात हरवला गंध, तुझ्या की ओठी

शून्यात गरगरे झाड, तशी ओढाळ, दिव्यांची नगरी
वक्षात तिथीचा चांद, तुझा की वैरी

Sunday, July 12, 2009

मी तिला विचारलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं........

तुमचं लग्न ठरवुन झालं?
कोवळेपण हरवुन झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती,बिंडा किती?
याचा मान,त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं...

ते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..
मी तिला विचारल,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......

मग एक दिवस,

चंद्र, सुर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणाऱ्या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधिच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरिसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे

मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येउन बसलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं......

पुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली...

तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं.......