०१
कोलाहलात सा-या माणूस शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी
हे धर्म, देवळे ही धुंडून सर्व आलो
भिंतीपल्याड त्यांच्या माणूस शोधतो मी
हव्यास हा सुखाचा, कल्लोळ वासनांचा
जळत्या चितेवरी या माणूस शोधतो मी
फासून रंग रात्री दिवसा भकास सारे
खिडकीत विक्रयाच्या माणूस शोधतो मी
काळ्या उभ्या तिजो-या गाणे खरीदणा-या
येथे जित्या गळ्याचा माणूस शोधतो मी
त्वेषात बाहुल्यांचे जाती जथे पुढे हे
कळसूत्र तोडुनी हे माणूस शोधतो मी
या झोपडयांत आली वाहून ही गटारे
चिखलात हुंदक्यांच्या माणूस शोधतो मी
या संस्कॄतीस सा-या ही चूड लाविली मी
वणव्यात पेटलेल्या माणूस शोधतो मी
--मंगेश पाडगांवकर
०५
गाण्यात सर्व माझ्या माझे इमान आहे
ज्याचे खरे न गाणे तो बेइमान आहे
येता समोर दु:खे तो षड्ज झेलला मी
काटयांवरी स्वरांची झुलती कमान आहे
झाडांत पावसाच्या बेहोष आरतीला
वाजे मृदंग तेथे माझाच प्राण आहे
कां वेदनेत होतो हा जन्म साधनेचा?
रेषाच संचिताची ही बेगुमान आहे
आयुष्य पेटताना ओठांत सूर होता
हे सोसणे सुराला माझ्या प्रमाण आहे
--मंगेश पाडगांवकर
०९
वाट होती आंधळी अन भोवती अंधार होता
हात तू हाती दिला गS एक हा आधार होता
सोशिले तू सर्व काही वाट माझी चालताना
साहिले पायांत काटे हा तुझा शृंगार होता
वैर केले या जगाने घाव सारे घेतले तू
पापण्यांनी झेलला गS तूच हा संसार होता
बोललो नाही तरीही जाणतो मी आत सारे
चांदणे झालीस, माझे दैव हे अंगार होता
गीत गाता अंतरीचे गीत मी गातो तुझे गS
तू दिलेल्या रागिणीला कोवळा गंधार होता
वाट होती आंधळी अन भोवती अंधार होता
हात तू हाती दिला गS एक हा आधार होता
सोशिले तू सर्व काही वाट माझी चालताना
साहिले पायांत काटे हा तुझा शृंगार होता
वैर केले या जगाने घाव सारे घेतले तू
पापण्यांनी झेलला गS तूच हा संसार होता
बोललो नाही तरीही जाणतो मी आत सारे
चांदणे झालीस, माझे दैव हे अंगार होता
गीत गाता अंतरीचे गीत मी गातो तुझे गS
तू दिलेल्या रागिणीला कोवळा गंधार होता
--मंगेश पाडगांवकर
१५
अवकाश भारलेला, प्राणांत चांदणे
दोघें अथांग आता संपून बोलणे
स्वप्नातल्या जळी या ही चंद्रकोर हाले
श्वासात श्वास आता गुंफून चालणे
पानांतुनी म्हणाले हलकेच फूल गाणे
नव्हतेच या क्षणांचे काहीच मागणे
कां पापण्यात आले दाटून सांग पाणी ?
कां हे असे सुखाचे भलतेच वागणे ?
--मंगेश पाडगांवकर
२१
पाऊस कोसळे हा, अंधारले दिसे
डोळे भरून आले माझे असे कसे ?
गेल्या बुडून वाटा, गेली बुडून राने
झाले उदास गाणे माझे असे कसे ?
या पावलांस लाटा ओढून खोल नेती
हे प्राण ओढ घेती माझे असे कसे?
कां सांग याद येते ? एकान्त हा सभोती
हे सूर डोह होती माझे असे कसे ?
--मंगेश पाडगांवकर
Wednesday, March 9, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment