Wednesday, March 9, 2011

गझल--

२८

भीती धरू कशाला जर जायचेच आहे
या मातिच्या घरांना विसरायचेच आहे

काळोख पाहताना हलली न पापणी ही
हे गीत एकटयाने मज गायचेच आहे

मृत्यूसमोर माझ्या मी वेचिली फुले ही
घेऊन माळ माझी मज यायचेच आहे

हे माग पावलांचे पुसतील पार लाटा
तेव्हा विनाकिनारा मज व्हायचेच आहे

--मंगेश पाडगांवकर

माझ्याच भावनांना मज जाळता न येते
माझ्याच वेदनांना मज टाळता न येते

असुनी अभाव सारा हे स्वप्न पाहतो मी
तुडवीत या फुलांना मज चालता न येते

संपेल मार्ग तेथे काळोख किर्र आहे
तरिही मलाच बेडी मज घालता न येते

बहिरे उभे सभोती हे वाजवीत टाळ्या
माझ्या उरात गाणे मज कोंडता न येते

ही रीत या जगाची अन वेगळीच भाषा
समजूत आसवांची मज काढता न येते

ही सांज काजळे अन बुडती तमात झाडे
प्राणातली उदासी मज टाकता न येते

--मंगेश पाडगांवकर

४७

निरोप घेताना डोळ्यांत आसवे आणणार नाही
जिवाच्या पाखरा पिंज-यात तुला कोंडणार नाही

कोसळली सर अंगावर माझ्या माझ्याचसाठी
पुन्हा वृष्टीसाठी लाचार मागणे मागणार नाही

पक्षी अचानक सांगत गूज झाडावर आला
उडून जाताना फांदीवर आशा टांगणार नाही

हळू बिलगले पाण्याला चांदणे उत्तररात्री
चंद्र बुडताना खोटे गहिवर काढणार नाही

कोवळ्या क्षणांची फूलपाखरे तुझ्यामुळे झाली
हाव-या हातांनी पंख तयांचे खुडणार नाही

प्रत्येक फुलाच्या धुंद कहाणीला शेवट असतो
पुस्तकातल्या सुकल्या फुलांना शापणार नाही

--मंगेश पाडगांवकर

४८

ते दान त्या क्षणाचे घेता मला न आले
उधळून प्राण माझे देता मला न आले

होते गळ्यात गाणे पण श्वास कोंडलेला
माझेच सूर तेव्हा गाता मला न आले

डोळ्यांत पाहिले मी आभाळ भारलेले
हे पंख कापलेले : उडता मला न आले

झोकून देत सारे आल्या उधाणलाटा
मी कोरडा किनारा, भिजता मला न आले

हे रान मोर झाले बेहोष नाचणारा
आषाढ झेलुनी तो फुलता मला न आले

जे मोजता न येते केला हिशोब त्याचा
होतो जिवंत तरिही जगता मला न आले

--मंगेश पाडगांवकर

No comments:

Post a Comment