.
.
.
ये नवीन होऊन पुन्हा तूं, ये नवीन होऊन
मृदुल उन्हांचें भिजवित रेशिम
ये कधिं रिमझिम श्रावणसरिसम
अर्ध-उमललेल्या फुलांभोवतीं हांसत फेर धरून
ये नवीन होऊन पुन्हा तूं, ये नवीन होऊन
कधिं फुटणार्या या लाटांपरि
कधिं हळव्या हिरव्या वाटांपरि
चांदण्यात कधिं कलश ढगांचे कांठोकांठ भरून
ये नवीन होऊन पुन्हा तूं, ये नवीन होऊन
कधिं भिजलेल्या बीजांमधुनी
नवा उमलता प्राण होऊनी
मृदुचंद्रातुन नवसृजनांचे आश्वासन मिरवून
ये नवीन होऊन पुन्हा तूं, ये नवीन होऊन
कधिं ललकारत आम्रवनांतुन
'कुहूकुहू' गंधात कालवुन
नव्या वसंतापरी अचानक प्राणांतुन उमलून
ये नवीन होऊन पुन्हा तूं, ये नवीन होऊन
कधीं पहाटे वाहत वाहत
फेनाच्या विस्मयात नाहत
ये तुझिया स्पर्शाचें कांचन निळ्या जळीं मिसळून
ये नवीन होऊन पुन्हा तूं, ये नवीन होऊन
यंत्रापरि हें होतां जीवन
मंत्रापरि ये ह्रद्नर्भांतुन
हे चिरयौवन, अखंडनूतन ! जीवनघन बरसून
ये नवीन होऊन पुन्हा तूं, ये नवीन होऊन
----------- मंगेश पाडगांवकर
----------- मुंबई
----------- १९-१०-५०
Sunday, July 12, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment