Sunday, July 5, 2009

सांगा कसं जगायचं ?

कण्हत कण्हत
की गाणं म्हणत ?
तुम्हीच ठरवा !

डोळे भरून
तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना ?
ऊन ऊन दोन घास
तुमच्यासाठी वाढतंच ना ?

शाप देत बसायचं
की दुवा देत हसायचं ?
तुम्हीच ठरवा ?

सांगा कसं जगायचं ?.........

काळ्याकुट्ट काळोखात
जेंव्हा काहीच दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेऊन उभं असतं !
काळोखात कुढायचं
की प्रकाशात उडायचं ?
तुम्हीच ठरवा !

सांगा कसं जगायचं ?......

पायात काटे
रुतून बसतात
हे अगदी खरं असतं ;
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं ?

काट्यांसारखं सलायचं
की फुलांसारखं फुलायचं ?
तुम्हीच ठरवा !

सांगा कसं जगायचं ?

पेला अर्धा सरला आहे
असंसुध्दा म्हणता येतं ;
पेला अर्धा भरला आहे
असंसुध्दा म्हणता येतं !
सरला आहे म्हणायचं
की भरला आहे म्हणायचं ?
तुम्हीच ठरवा !

सांगा कसं जगायचं ?
कण्हत कण्हत
की गाणं म्हणत ?
तुम्हीच ठरवा !

No comments:

Post a Comment