Sunday, July 12, 2009

शिशिरामधल्या उत्तररात्रीं

.
.

शिशिरामधल्या उत्तररात्रीं आकाश मनांत झुरे,
निष्पर्ण तरूंच्या भोंवतीं वारा उदास होऊन फिरे !

दुरून एकला तारा
करितो गूढ इषारा
गहन कोषांत तमाच्या उरीं कुणाची वेदना स्फुरे ?
शिशिरामधल्या उत्तररात्रीं आकाश मनांत झुरे !

फुटती व्याकुळ लाटा
शोधीत स्वप्नींच्या वाटा
मनांत प्राणांत घुमून ध्वनी विराट लयींत विरे
शिशिरामधल्या उत्तररात्रीं आकाश मनांत झुरे !

कुणाची निरव भाषा
भारिते अथांग निशा ?
गिरींत दरींत, दूरच्या वनीं अंधार अजून उरे
शिशिरामधल्या उत्तररात्रीं आकाश मनांत झुरे !

दाटून राहिलें धुकें
भोवतीं अबोल मुकें
मधेंच उडत विचित्र पक्षी तमाच्या कुशींत शिरे
शिशिरामधल्या उत्तररात्रीं आकाश मनांत झुरे !

भरून आकांश, दिशा
कुणाची सृजन-तृषा ?
सारयाच सृष्टींत रितेपणाची वेदना व्यापून उरे
शिशिरामधल्या उत्तररात्रीं आकाश मनांत झुरे !

शिशिरामधली रात्र
उदास आर्त विचित्र !
सुनेपणावर ढाळीत बसे दंवाचीं कोंवळीं फुले !
शिशिरामधल्या उत्तररात्री आकाश मनांत झुरे
निष्पर्ण तरूंच्या भोवतीं वारा उदास होऊन फिरे !

----------- मंगेश पाडगांवकर
----------- मुंबई
----------- ३१-१-५१

No comments:

Post a Comment