विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही
मी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही
विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही
झुरते बन माडांचे, आणि शुक्रतारा
भरतीचे स्वप्न बघत, विकल का किनारा
रंग रंग विरले रे, खिन्न दिशा दाही
सांजवेळ, संथ डोह, हाक जीवघेणी
शब्दाविण डोळ्यांनी, वाचिली कहाणी
तो वेडा स्पर्श काय, छळिल रे तुलाही
का, चुकल्या वाटा अन् का घडल्या भेटी
का जपले दवहळवे, गीत तुझ्यासाठी
सूरसूर बुडले रे, अदय या प्रवाही
सूर मनांतिल कधिही, आणु नये ओठी
लावु नये जीव असा, कधिच कुणासाठी
निर्माल्यच ये करात, गंध उडुन जाई
पुढल्या जन्मीच पुरे हे अधुरे गाणे
पुढल्या जन्मीच पुरे स्वप्न हे दिवाणे
चुरलेली शपथ तिथे विसरणार नाही
--- मंगेश पांडगावकर
Friday, July 3, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment