Friday, July 3, 2009

निरोप घेताना.........

निरोप घेताना डोळ्यांत आसवे आणणार नाही
जिवाच्या पाखरा पिंज-यात तुला कोंडणार नाही

कोसळली सर अंगावर माझ्या माझ्याचसाठी
पुन्हा वृष्टीसाठी लाचार मागणे मागणार नाही

पक्षी अचानक सांगत गूज झाडावर आला
उडून जाताना फांदीवर आशा टांगणार नाही

हळू बिलगले पाण्याला चांदणे उत्तररात्री
चंद्र बुडताना खोटे गहिवर काढणार नाही

कोवळ्या क्षणांची फूलपाखरे तुझ्यामुळे झाली
हाव-या हातांनी पंख तयांचे खुडणार नाही

प्रत्येक फुलाच्या धुंद कहाणीला शेवट असतो
पुस्तकातल्या सुकल्या फुलांना शापणार नाही

--मंगेश पाडगांवकर

No comments:

Post a Comment