जीव भरुन पहावे तुला एकदा
रानाच्या बरगड्यातून पळस पेटताना.
पाण्याच्या रिकाम्या चेहेऱ्याच्या
शुभ्र शुभ्र कळ्या होताना.
जीव भरुन पहावे तुला एकदा
अनिवार हाक प्राणात भरुन:
मोर अंधाराचा थुईथुई भिजताना
पिसाऱ्याचे उधळे आभाळ करुन.
जीव भरुन पहावे तुला एकदा
कळ्यांच्या पहाटे,फुलांच्या सकाळी;
काजव्यांच्या लिपीतले झुलते गाणे
मिटल्या डोळ्यात ओलावताना कधी काळी.
जीव भरुन पहावे तुला एकदा.
जीव भरुन तुझे व्हावे एकदा.
Sunday, July 5, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment